Thursday, September 3, 2026

कुंभार्ली घाटात टँकर उलटल्याने चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात आज सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास टँकर पलटी झाल्याची भीषण घटना घडली. घाटातील सोनपत्राच्या वरील बाजूस असलेल्या एका मोठ्या व तीव्र वळणावर टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर टँकर थेट रस्त्याच्या मध्यभागी आडवा झाल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे घाटात दोन्ही बाजूंना वाहनांच्या कित्येक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या असून, सकाळच्या वेळी प्रवासाला निघालेल्या प्रवाशांना व चाकरमान्यांना मोठ्या कोंडीचा सामना करावा लागत आहे.

घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अपघातग्रस्त टँकर रस्त्यावरून बाजूला हटवण्यासाठी क्रेन आणि आवश्यक यंत्रणा तैनात करण्यात आली असून, रस्ता लवकरात लवकर मोकळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे अडथळे दूर झाल्यानंतरच घाटातील वाहतूक पूर्ववत होणे शक्य आहे. पोलीस प्रशासन परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून असून प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

दरम्यान, कुंभार्ली घाट हा तीव्र वळणांचा आणि धोकादायक मार्ग असल्याने येथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष दक्षता व काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या घाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असल्याने प्रवाशांनी संयम बाळगून पोलिसांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी शक्य असल्यास वाहनचालकांनी इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

शेअर करा

आणखी वाचा