अलोरे शिरगाव (ता. चिपळूण): मौजे गजमल पिंपळी बुद्रुक येथे एका बंद घराचे कडी-कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ३ लाख ३७ हजार २३२ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लांबवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीत घर बंद असताना ही चोरी करण्यात आली. या प्रकरणी फिर्यादी विलास रघुनाथ गजमल (वय ६१, रा. परळ भोईवाडा, मुंबई, मूळ रा. गजमल पिंपळी बुद्रुक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादींच्या गैरहजेरीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कडी-कुलूप कोणत्या तरी हत्याराने उचकटून आत प्रवेश केला आणि लबाडीच्या इराद्याने चोरी केली. या घरफोडीत चोरट्याने ३ लाख १० हजार ९११ रुपये किमतीचे ४२.१६५ तोळे सोन्याचे दागिने, ६ हजार ३२१ रुपये किमतीचे ७४.८ तोळे चांदीचे दागिने आणि २० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३,३७,२३२ रुपयांचा ऐवज लांबवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
