Saturday, June 6, 2026

रॅगिंगचे लोण रत्नागिरीतही?, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी – मोठ्या शहरांमधील रॅगिंगचे लोण आता रत्नागिरीतही पोहोचले असून या प्रकरणाची माहिती मिळताच रत्नागिरी शहरात संतापाची लाट उसळली आहे. रत्नागिरी शहरातील लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. “कॉमन ऑफ” घेण्याच्या नावाखाली आठ विद्यार्थ्यांनी तीन विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पीडित विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात याबाबत तक्रार वजा निवेदन दिले आहे. यामध्ये त्या त्रास देणाऱ्या आठ विद्यार्थ्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हे पीडित तीन विद्यार्थी महाविद्यालयातील एफवाय इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग शाखेत शिक्षण घेत आहेत. याच विभागातील अन्य आठ विद्यार्थ्यांनी तक्रारदार तीनही विद्यार्थ्यांवर मनमानी करण्यास सुरुवात केली होती. कॉमन ऑफ घेण्यासाठी या तीन विद्यार्थ्यांवर त्या आठ विद्यार्थ्यांकडून दबाव आणला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र तक्रारदार विद्यार्थ्यांनी या दबावाला झुगारून विरोध दर्शवला त्यामुळे त्या आठ विद्यार्थ्यांनी एकजूट करून तीन विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

सातत्याने शिवीगाळ करणे, धमक्या देणे, विनाकारण वाद घडवणे, असे प्रकार सुरू झाले. सातत्याने होत असलेल्या या त्रासामुळे आपल्याला असुरक्षित वाटत असल्याचे प्राचार्य आणि पोलिसांना दिलेल्या निवेदनात या पीडित विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. सातत्याने होत असलेल्या या त्रासामुळे आमच्या शैक्षणिक प्रगतीवर त्याचा विपरीत परिणाम होत असून असुरक्षिततेचे वातावरण आमच्यात निर्माण झाले आहे. याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे..

शेअर करा

आणखी वाचा