Thursday, September 3, 2026

रुपाली चाकणकरांना अशोक खरात कनेक्शन भोवलं; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Date:

मुंबई प्रतिनिधी : महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असेलला भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. या अशोक खरातच्या काळ्या कृत्याचे अनेक व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत. या प्रकरणात राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप झाले. इतकेच नाही तर अशोक खरात यांच्यासोबतचे फोटो, व्हिडिओ सुद्धा समोर आले. यानंतर सुषमा अंधारे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अखेर रुपाली चाकणकर यांना हे प्रकरण भोवलं आहे. रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी रुपाली चाकणकर यांनी आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला.

मुख्यमंत्र्यांकडून राजीनाम्याचे आदेश – रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी (20 मार्च) मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. अखेर रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट करण्याची मागणी : अशोक खरात याच्या काळ्या कृत्यात रुपाली चाकणकर सहभागी असल्याचा संशय असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.

पोलीस महासंचालकांची भेट : रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी (20 मार्च) राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले. या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल आणि वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी आणि आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितले.

शेअर करा

आणखी वाचा