Monday, April 20, 2026

सावधान! शेअर मार्केटच्या नावाखाली रत्नागिरीतील कुटुंबाला ९० लाखांचा गंडा; ठाण्यातील तरुणावर गुन्हा दाखल

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना लुटण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून रत्नागिरीतील एका कुटुंबाची ९० लाख १ हजार ३०० रुपयांची फसवणूक झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ठाण्यातील एका २५ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय? : रत्नागिरीतील ओसवालनगर भागात राहणारे २१ वर्षीय तरुण महमद अवाद अजीज वागळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना आरोपी फैजान नस्दीन शेख (वय २५, रा. अमृतनगर, जि. ठाणे) याने आपल्या जाळ्यात ओढले होते. आरोपीने त्यांना शेअर मार्केटमधील एका ‘विशेष योजने’ची माहिती दिली. अवघ्या चार महिन्यांत या गुंतवणुकीवर प्रचंड नफा मिळेल, असे स्वप्न त्याने वागळे कुटुंबाला दाखवले होते.

अशी झाली फसवणूक: : आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वागळे कुटुंबाने नोव्हेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत वेळोवेळी मोठी रक्कम गुंतवली.

एकूण रक्कम: ₹९०,०१,३००/-

काही रक्कम आरोपीने प्रत्यक्ष घरी येऊन घेतली, तर काही रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आली.

गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर जेव्हा वागळे यांनी नफा आणि मुद्दल रकमेची मागणी केली, तेव्हा आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याचे पाहून आपली फसवणूक झाल्याचे या कुटुंबाच्या लक्षात आले.

पोलिसांत गुन्हा दाखल : अखेर १८ एप्रिल रोजी रात्री याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी आरोपी फैजान शेख याच्यावर भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१८(२) आणि ३१८(४) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

शेअर करा

आणखी वाचा