Saturday, June 6, 2026

चिपळूणमध्ये धक्कादायक घटना: बोलण्याच्या बहाण्याने पत्नीला सासरी नेऊन अमानुष मारहाण; पतीवर गुन्हा दाखल

Date:

चिपळूण प्रतिनिधी : बोलण्याच्या बहाण्याने पत्नीला तिच्या माहेरून सासरी नेऊन, तिथे वाद घालून तिला अमानुषपणे मारहाण केल्याची संतापजनक घटना चिपळूणमधील काविळतळी येथे घडली आहे. या प्रकरणी पीडित पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचा थरार : मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निशात अजमल कडवईकर (वय ३३, रा. उक्ताड, चिपळूण) या काही कारणास्तव सध्या आपल्या माहेरी राहत आहेत. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास आरोपी पती अजमल अस्लम कडवईकर हा उक्ताड येथील त्यांच्या माहेरी गेला. “मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे,” असे गोड बोलून त्याने निशात यांना विश्वासात घेतले आणि काविळतळी येथील ‘कोयना बिल्डिंग’मधील आपल्या घरी नेले.

दोघेही घरी पोहोचल्यावर त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर लवकरच हिंसेत झाले. रागाच्या भरात अजमलने पत्नीला हाताच्या थापटाने मारहाण करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

क्रूरतेचा कळस : पतीच्या त्रासाला कंटाळून निशात जेव्हा तिथून परत जाऊ लागल्या, तेव्हा आरोपीने त्यांना जबरदस्तीने ओढले. त्याने निशात यांचे डोके दोन्ही हातांनी धरून त्यांच्या दोन्ही गालांवर व उजव्या हातावर जोरात चावा घेतला. या झटापटीत आरोपीच्या हातातील घड्याळ लागून निशात यांच्या डाव्या डोळ्याखालीही दुखापत झाली.

पोलिसांत गुन्हा दाखल : या गंभीर प्रकारानंतर जखमी निशात कडवईकर यांनी तत्काळ चिपळूण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपी पती अजमल कडवईकर विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या खालील कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे:

कलम ११८(१): धोकादायक शस्त्राने किंवा साधनांनी दुखापत करणे.

कलम ११५(२): स्वेच्छेने दुखापत करणे.

कलम ३५२: शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे.

कलम ३५१(२) आणि (३): गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे.

या गुन्ह्याची रीतसर नोंद करण्यात आली असून, चिपळूण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शेअर करा

आणखी वाचा