Saturday, June 6, 2026

प्रवाशांनी भरलेली बस डिझेल भरण्यासाठी नेली जातेय रॅम्पवर; रत्नागिरीतील धक्कादायक प्रकार

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : शहरात धावणाऱ्या एसटीच्या शहरी बससेवेबाबत प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांनी गच्च भरलेली बस चक्क डिझेल भरण्यासाठी माळनाका येथील एसटी रॅम्पवर नेली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा होत आहे. याप्रकरणी रत्नागिरी विभाग नियंत्रकांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय :;शहरात येणाऱ्या बसमध्ये प्रवासी असताना चालक आणि वाहक गाडी डिझेल भरण्यासाठी रॅम्पवर नेतात. तिथे आधीच ४ ते ५ गाड्या रांगेत असल्यास प्रवाशांना १५ ते २० मिनिटे ताटकळत बसावे लागते. यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांना आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. “प्रवाशांना बस स्थानकावर सोडल्यानंतर रिकामी गाडी डिझेल भरण्यासाठी न्यावी,” अशी मागणी संजय शंकर नागवेकर यांनी तक्रार पत्राद्वारे केली आहे.

‘सर्व्हिस’च्या नावाखाली शहरी बसचा वापर :;केवळ डिझेलचाच प्रश्न नसून, बस सोडण्याच्या नियोजनातही मोठा गोंधळ असल्याचे समोर आले आहे. अनेकदा ‘सर्व्हिस बस’ ऐवजी ‘शहरी बस’ सोडली जाते आणि प्रवाशांकडून मात्र सर्व्हिस बसचे जादा तिकीट आकारले जाते. हा प्रकार पूर्णतः चुकीचा असून अशा प्रथा तातडीने बंद करण्याची मागणी होत आहे.

या तक्रारीची प्रत रत्नागिरी डेपो मॅनेजर तसेच स्थानिक वृत्तपत्रांनाही देण्यात आली आहे. आता एसटी प्रशासन या गंभीर तक्रारीची दखल घेऊन प्रवाशांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

आणखी वाचा