रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी तालुक्यातील जांभारी फाटा येथे २९ जिवंत गावठी बॉम्ब (हातबॉम्ब) सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हे बॉम्ब पोलिसांनी बॉम्ब शोध व नाशक पथकाच्या मदतीने नष्ट केले आहेत. यापूर्वी याच परिसरात झालेल्या एका स्फोटात एक महिला गंभीर जखमी झाली होती, ज्याची दखल घेत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
जांभारी फाटा येथील एका रिकाम्या बंगल्याच्या मागील मोकळ्या जागेत रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४७) या १९ मे रोजी ‘कलक’ तोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने जंगली प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने तिथे गावठी हातबॉम्ब उघड्यावर टाकले होते. त्यापैकी एक बॉम्ब रेश्मा यांनी हातात घेतल्यावर त्याचा अचानक स्फोट झाला. या भीषण स्फोटात त्यांच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे.
पोलिस तपासात २९ जिवंत बॉम्ब हस्तगत : या घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी तातडीने तपास चक्रावली फिरवली. अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी स्वतः पोलीस पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. तपासादरम्यान त्याच परिसरात आणखी २९ जिवंत गावठी बॉम्ब मिळून आले. पोलिसांनी तातडीने बीडीडीएस (BDDS) पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. घटनास्थळाचा रितसर पंचनामा केल्यानंतर, न्यायालयाच्या परवानगीने हे सर्व २९ बॉम्ब सुरक्षितपणे नष्ट करण्यात आले.
गुन्हा दाखल : वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी मानवी जीविताला धोका निर्माण होईल अशा प्रकारे बॉम्ब ठेवल्याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये: भारतीय न्याय संहिता कलम: १२५ (अ), १२५ (ब), २८८, भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियम कलम: ३, ४, ५ या कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.






