चिपळूण प्रतिनिधी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) खेड-खेर्डी येथील अतिक्रमणे जमीनदोस्त केल्यानंतर, आता प्रशासनाने आपले लक्ष लोटे आणि गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतींकडे वळवले आहे. लोटे औद्योगिक परिक्षेत्रातील सुमारे १७० जणांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या असून यामध्ये गोशाळा, टपरीधारक आणि काही पक्क्या बांधकामांचा समावेश आहे. या कारवाईमुळे परिसरात सध्या खळबळ उडाली असून अनधिकृत बांधकामे स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कारवाईत पोलीस बंदोबस्ताचा अडथळा: : अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू असली, तरी पोलीस बंदोबस्त मिळवण्यात अडचणी येत असल्याने ही कारवाई वारंवार पुढे ढकलली जात आहे. लोटे परिसरातील १७० नोटिसांपैकी अनेकांनी अद्याप आपली अतिक्रमणे हटवलेली नाहीत. दुसरीकडे, गाणे-खडपोली परिसरात २३ अनधिकृत बांधकामांची नोंद झाली असून, त्यातील काही बांधकाम धारकांनी ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याचा दावा केल्याने तिथे फेरसर्वेक्षणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
व्यावसायिकांची स्वतःहून माघार: : लोटे एमआयडीसीतील रस्त्यालगतच्या खोकेधारकांना प्रशासनाने कडक इशारा दिल्यानंतर, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. माजी खासदार अनंत गीते यांनी मध्यस्थी करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रशासनाने थेट कारवाईचे संकेत दिल्याने अनेक व्यावसायिकांनी पुढील नुकसान टाळण्यासाठी स्वतःहून आपली दुकाने आणि खोके हटवण्यास सुरुवात केली आहे. ज्यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही, त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे बांधकाम पाडण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
पावसाळ्यापूर्वी मोहीम फत्ते करण्याचे आव्हान :मे महिना संपत आला असून पावसाळा तोंडावर असल्याने उर्वरित ठिकाणची अतिक्रमणे कधी हटणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाऊस सुरू झाल्यास तांत्रिक कारणास्तव ही मोहीम पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाल्यास लोटे आणि गाणे-खडपोली परिक्षेत्रात मोठी कारवाई पाहायला मिळू शकते. सध्यातरी या संपूर्ण मोहिमेचे यश पोलीस बंदोबस्ताच्या उपलब्धतेवर अवलंबून असल्याचे चित्र दिसत आहे.
