रत्नागिरी प्रतिनिधी : बेंगलोर पोलीस आणि नवी दिल्लीतील ‘सीबीआय’ (CBI) अधिकारी असल्याचे भासवून रत्नागिरीतील एका नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्य टोळीचा रत्नागिरी सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे तांत्रिक तपास करत दिल्लीतून गगनदीप भारद्वाज (रा. नोएडा, दिल्ली) या मुख्य आरोपीला मुसक्या आवळून रत्नागिरीत आणले आहे. माननीय न्यायालयाने आरोपीला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
‘कॅनरा बँकेत ३ कोटींचा फ्रॉड’ आणि ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती : या खळबळजनक घटनेची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपींनी फिर्यादी यांना फोन करून आपण बेंगलोर पोलीस आणि सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. “तुमचे मुंबईतील माटुंगा येथील कॅनरा बँकेत खाते असून, त्या खात्यातून ३ कोटी रुपयांचा मोठा आर्थिक घोटाळा (फ्रॉड) झाला आहे,” अशी भीती आरोपींनी फिर्यादींना घातली. एवढेच नव्हे तर, या गुन्ह्याच्या तपासाच्या नावाखाली फिर्यादींना ‘डिजिटल अरेस्ट’ (ऑनलाईन नजरकैद) करण्यात आले असल्याचे सांगून धमकावण्यात आले. या भीतीच्या सावटाखाली ठेवून आरोपींनी दि. ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी पैशांची मागणी केली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येण्यापूर्वी फिर्यादी यांनी आरोपींना एकूण १,२३,००,०००/- (१ कोटी २३ लाख) रुपये दिले होते.
सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीवरून पोलिसांने सायबर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ०२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८(२), ३१८(४), ३१९(२), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) २००० चे कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल केला.
अशी झाली दिल्लीत कारवाई
गुन्ह्याचे गांभीर्य आणि रक्कम मोठी असल्याने रत्नागिरी पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली. सायबर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने आधुनिक तांत्रिक विश्लेषण केले. तसेच दिल्लीत स्थानिक बातमीदार (खबरी) तयार करून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे नोएडा-दिल्ली येथून आरोपी गगनदीप भारद्वाज याला ताब्यात घेतले. त्याला रत्नागिरीत आणून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत.
या पथकाने केली कामगिरी
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस हवादार (बकल नं. १०४०) संदीप नाईक आणि पोलीस कॉन्स्टेबल (बकल नं. ७३९) सौरभ कदम यांच्या पथकाने केली आहे.
