Saturday, June 13, 2026

दापोलीत हॉटेलच्या आवारात क्रेटा कार रिव्हर्स घेताना ३ वर्षांच्या चिमुरडीचा चिरडून मृत्यू

Date:

दापोली (प्रतिनिधी): दापोली तालुक्यातील हर्णे-आंजर्ले बायपास रोडवर असलेल्या लेमन ट्री हॉटेलच्या आवारात एक अत्यंत दुर्दैवी, धक्कादायक आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे. हॉटेलच्या आवारात क्रेटा कार रिव्हर्स घेताना ३ वर्षांच्या चिमुरडीचा चिरडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण दापोली परिसरात तीव्र संताप आणि मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.  

या हॉटेलच्या परिसरात असलेल्या एका वडाच्या झाडाखाली अवघ्या ३ वर्षे ८ दिवस वयाची चिमुरडी सान्वी गणपती राठोड ही गाढ झोपलेली होती. मूळचे कर्नाटक राज्यातील विजापूर येथील रहिवासी असलेले तिचे वडील गणपती प्रेमु राठोड हे सध्या दापोलीतील खेर्डी फाटा येथे मोलमजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. उन्हाच्या झळा आणि थकव्यामुळे चिमुरड्या सान्वीला वडाच्या झाडाच्या थंडगार सावलीत झोपवण्यात आले होते, मात्र काही वेळातच या ठिकाणी काळ घाला घालेल अशी पुसटशी कल्पनाही तिच्या गरीब पालकांना नव्हती. खेळता-खेळता झाडाखाली झोपलेली आपली निष्पाप मुलगी अचानक कायमची सोडून जाईल या धक्क्याने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याच वेळी हॉटेलच्या आवारात उपस्थित असलेला आरोपी कार चालक बापू हिरामण पवार (रा. सुतारकोड जालगाव, ता. दापोली) याने आपल्या ताब्यातील क्रेटा गाडी (क्र. MH-08 AX-5887) बाहेर काढण्यास सुरुवात केली. कार चालकाने पाठीमागे नेमके काय आहे किंवा कोणी झोपलेले आहे का, याचा कोणताही अंदाज न घेता गाडी अत्यंत हयगयीने, अविचाराने आणि बेजबाबदारपणे मागे (रिव्हर्स) घेण्यास सुरुवात केली. कार चालकाचे पाठीमागे अजिबात लक्ष नसल्यामुळे, पाठीमागे घेत असलेल्या क्रेटा कारचे जड चाक थेट झाडाखाली शांतपणे झोपलेल्या निष्पाप सान्वीच्या डोक्यावरून गेले. कार डोक्यावरून गेल्याने सान्वीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे तिचा जागीच अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेनंतर मृत मुलीचे वडील गणपती राठोड यांनी तातडीने दापोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली असून, त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी कार चालक बापू पवार याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.  

शेअर करा

आणखी वाचा