रत्नागिरी प्रतिनिधी : शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटना व रत्नागिरी जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने गुरुवार, दिनांक ९ जुलै २०२६ रोजी ‘राज्यव्यापी शाळा बंद’ आंदोलनाची अधिकृत हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाद्वारे शिक्षकांच्या अत्यंत महत्त्वाच्या ४ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने टीईटी (TET) परीक्षेची अनिवार्यता, पदोन्नती विषयक अन्यायकारक अटी, संच मान्यतेचे चुकीचे धोरण आणि शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या बीएलओ (BLO) कामाच्या सक्तीचा त्रास थांबवणे या मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनाबाबतची रीतसर नोटीस रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आली आहे.
मुंबईत आझाद मैदानावर धरणे तर रत्नागिरीत तीव्र निदर्शने: या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून मुंबईतील आझाद मैदानावर भव्य धरणे, निदर्शने व सत्याग्रह केला जाणार असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हा मोर्चा माळनाका येथून निघून थेट जिल्हा परिषद कार्यालयावर धडकणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आवारात शिक्षकांचे तीव्र धरणे आंदोलन पार पडणार आहे. या आंदोलनात शिक्षक संघटनांसह इतर संलग्न संघटना, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
