Thursday, September 3, 2026

पाच वाजताची बस सुरू न झाल्यास पिरंदवणेतील पालकांचा थेट शाळा-कॉलेजवर बहिष्काराचा आक्रमक इशारा

Date:

संगमेश्वर प्रतिनिधी: “धोका पत्करून शिक्षण घेण्यापेक्षा आमच्या पाल्यांचा जीव आम्हा पालकांसाठी अधिक महत्त्वाचा आहे. केवळ शिक्षणासाठी आम्ही आमच्या काळजाच्या तुकड्यांना बिबट्या आणि हिंस्त्र प्राण्यांच्या जबड्यात ढकलू शकत नाही,” अशा अत्यंत आक्रमक शब्दांत पिरंदवणे येथील पालकांनी देवरुख एसटी प्रशासनाला धारेवर धरले. संगमेश्वर-पिरंदवणे ही संध्याकाळी ५:०० वाजताची हक्काची बस फेरी देवरुख आगाराने अचानक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ गणेश आंग्रे, सतीश जांभळे व व्यापारी दशरथ घेवडे यांनी आगार अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सुपूर्द केले. पिरंदवणे गावात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना फुणगूस, संगमेश्वर किंवा देवरुख येथे जावे लागते. ही संध्याकाळची ५ ची गाडी बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आता रात्री साडेआठ वाजेपर्यंत १२ ते १३ तास घराबाहेर राहावे लागत असून, या कारभारामुळे संतप्त पालकांनी आता थेट शाळा-कॉलेजवर बहिष्काराचा आरपारचा पवित्रा घेतला आहे.

रात्रीचा अंधार, बिबट्याची दहशत अन् प्रशासनाचा ढिम्म कारभार; अनर्थ घडल्यास एसटी आगारच जबाबदार! : पिरंदवणे गावाची भौगोलिक परिस्थिती अत्यंत दुर्गम असून, येथील वाड्या-वस्त्या मुख्य रस्त्यापासून दूर जंगलाच्या भागात विखुरलेल्या आहेत. सध्या या संपूर्ण परिसरात बिबट्या आणि गवे रेडे यांसारख्या हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. ५ ची बस बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना रात्रीच्या घोर अंधारात रानावनातून पायी प्रवास करावा लागत असल्याने, मुले सुखरूप घरी येईपर्यंत पालकांच्या काळजात सतत धडधड सुरू असते. यापूर्वी अनेकदा तक्रारी करूनही देवरुख एसटी प्रशासनाने या समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाने कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता ही बस तातडीने सुरू करावी; अन्यथा पालकांच्या आंदोलनामुळे मुलांचे जे काही शैक्षणिक नुकसान होईल, त्याला केवळ आणि केवळ देवरुख एसटी आगार प्रशासनच पूर्णपणे जबाबदार असेल, असा सज्जड इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

शेअर करा

आणखी वाचा