Thursday, September 3, 2026

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे निवासी ‘सहकार कार्यकर्ता प्रशिक्षण’ वर्गाचे आयोजन

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : सध्याच्या स्पर्धात्मक युगात सहकारी संस्था अधिक सक्षम होण्यासाठी आणि ग्रामीण व कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने एका विशेष निवासी सहकार कार्यकर्ता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दि. ३१ जुलै २०२६ ते दि. ०२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण (ता. चिपळूण) येथे पार पडणार आहे. सहकार क्षेत्रातील नामांकित ‘डॉ. विठ्ठलराव विखेपाटील प्रबंध संस्थान, पुणे’ या संस्थेच्या सहकार्याने हे सत्र घेतले जाईल. आजच्या तरुण पिढीला सहकाराचे महत्त्व कळावे, तरुण नेतृत्व घडावे तसेच सहकारातील आधुनिक तंत्रज्ञान, बँक व्यवसाय आणि विविध सहकारी संस्थांच्या कामकाजाची सखोल माहिती कार्यकर्त्यांना मिळावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.  

या प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रामुख्याने सहकारी कायदा, वित्तीय व्यवस्थापन, संचालक मंडळाची कार्यपद्धती, त्यांच्या जबाबदाऱ्या आणि संस्थांचे लेखापरीक्षण यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या घटकांवर तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. सहकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या किंवा काम करू इच्छिणाऱ्या सर्व इच्छुक पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांना यात सहभागी होता येईल. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत संबंधित तालुक्यातील क्षेत्रीय कार्यालयात किंवा प्रधान कार्यालयातील प्रशासन विभागात अर्ज सादर करायचे आहेत. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण संस्थेमार्फत अधिकृत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.  
शेअर करा

आणखी वाचा